गुन्हा, गुन्हेगार आणि पोलीस ह्यांविषयी सर्वच माणसांमध्ये एक कुतूहल असते. गुन्हा का झाला? आणि पोलिसांनी तो शोधण्यासाठी कोणते कौशल्य पणाला लावले, हे जाणून घेण्याची सुप्त इच्छा अनेकांना असते.
गुन्हा झाल्यानंतर त्या बातम्या आपण वाचतो आणि पुढे विसरून जातो. काही दिवसांनी, कधीकधी तर काही वर्षांनी त्या गुन्ह्यामागचे गूढ आणि कोडे उलगडण्यात पोलिसांना यश मिळते.
अशा वेळी संपूर्ण गुन्हा, त्याची पार्श्वभूमी व पुढे त्याचा लागलेला तपास हा प्रतिभावान पत्रकाराला खुणावत राहतो. गुन्ह्याची पार्श्वभूमी, गुन्हा, गुन्हेगार आणि पोलीस या सर्वांच्या मागे एक मानवी मन असते. पोलीस गुन्ह्याचा शोध लावतात, तर कसबी पत्रकार त्यातल्या मानवी मनाचा, पशुत्वाचा, असहायतेचा, क्रौर्याचा शोध घेत राहतो.
जयंत शिंदे हे उत्तम ललित लेखक असलेले क्राईम पत्रकार आहेत. गेली २५ वर्षे सातत्याने ते ह्यांविषयी लिहीत आले आहेत. त्यांनी विविध ठिकाणी लिहिलेल्या अनेक पोलीस तपासकथांपैकी काही निवडक कथा ह्या संग्रहात समाविष्ट केल्या आहेत.