पठ्ठे बापुराव उत्तर पेशवाईकालीन इतिहासप्रसिद्ध सहा शाहिरीनंतरचा गणला गेलेला प्रख्यात सातवा शाहीर. त्यांचा महाराष्ट्रभर शिष्यवर्ग विखुरलेला आहे. त्यांच्या चरित्राची सुसंगत व सुसूत्र मांडणी येथे केली आहे. बापुराव भेदिक कवी व शाहीर. भेदिक आखाड्याचे. नागेशवळीचे,कलगीपक्षाचे, गुरुपरंपरेने नाथपंथी, कालीमातेचे उपासक, शाक्तपंथी. भेदिक फडासाठी सर्व प्रकारी रचना करून आध्यात्मिक कलगीतुर्याचे अटीतटीचे तत्कालीन शाहिरांशी सामने केले. कवी व शाहिरी हैबतीनंतर भेदिकाचे पुनरुज्जीवन केले. पठ्ठे बापुरावांनी रंगीत तमाशाची पायाभरणी करून तो अधिक लोकाभिमुख व लोकप्रिय केला. शाहिरी वाङ्मय व तमाशामध्ये आमूलाग्र परिवर्तन केले. रंगबाजी लावणी, छक्कड, विविध प्रकारी, विविध चालींची लावणी, झगड्याची लावणी, शाहिरी वाङ्मय प्रकारांत फार्स या नवीन प्रकाराची भर, त्यातील बतावणी, संगीत पदे,लावणीला नाट्य, संगीताची जोड देऊन तमाशा रंगीत व रंजक केला. या ग्रंथातील भेदिक संहितेचा व रंगीत तमाशा संहितेचा सर्वांगीण, समग्र अभ्यास अर्थच्छटांसह व तत्त्वविवेचनासह केलेला अभ्यास वैशिष्ट्यपूर्ण ठरतो.