प्रा. मुरलीधर सायनेकर हे नाव मराठी समीक्षाक्षेत्रात एक गंभीर, चिकित्सक व शोधक वृत्तीचे समीक्षक म्हणून केव्हाचेच सुस्थिर झालेले आहे. त्यांचा ‘परीक्षणे आणि निरीक्षणे’ हा नवा समीक्षालेखसंग्रह त्यांच्या या वृत्तीचाच द्योतक आहे.
या संग्रहात वि. ना. ढवळे, नरहर कुरुंदकर, स. गं. मालशे,
भीमराव कुलकर्णी, चंद्रकांत बांदिवडेकर, विजया राजाध्यक्ष,
अरुण टिकेकर, व्यंकटेश माडगूळकर, दया पवार इत्यादी मान्यवरांच्या ग्रंथांची सर्वांगसुंदर परीक्षणे आहेत.
मराठी ग्रंथांबरोबरच या संग्रहात ‘आफ्टर ऍम्नेशिया’,
‘इन थिअरी...’, ‘अ डिक्शनरी ऑफ वर्ल्ड मायथॉलॉजी’,
‘द एन्सायक्लोपीडियाज् ऑफ इण्डिया’ इत्यादी भारतीय साहित्य व संस्कृती यांच्या विचाराकरिता महत्त्वाच्या अशा इंग्रजी
ग्रंथावरील समतोल समीक्षणेही समाविष्ट आहेत.
प्रा. सायनेकर यांच्या समीक्षापद्धतीचा विशेष म्हणजे ते ग्रंथांच्या गुणदोषदिग्दर्शनापाशीच न थांबता त्या त्या ग्रंथाच्या निमित्ताने साहित्यतत्त्वांची मूलभूत चर्चाही करतात. अशी चर्चा कधीकधी ते कुसुमाग्रज, जी. ए., सीमस हीनी यांसारख्या भारतीय व पाश्चात्त्य लेखकांच्या प्रज्ञाप्रतिभेचा वेध घेणारे टिपण-लेख लिहूनही करतात.
प्रा. सायनेकर यांचा हा सशक्त व सुंदर समीक्षालेखसंग्रह आजच्या मराठी समीक्षासृष्टीमध्ये उठून दिसणारा आहे.