आसमंतातील, जनसागरातील आणि स्वमनातील वादळांना कवयित्री पद्मजा आपल्या प्रज्ञाप्रतिभेशी सामोर्या गेलेल्या आहेत. त्यामुळे दिशाहीन वादळवार्यांना त्या शब्दांची गवसणी घालू शकल्या आहेत. धनांध वादळांकडे पायदर्शीपणे पाहण्याची किमया पद्मजा यांनी साध्य केलेली आहे. त्यांचा ‘पारदर्शी वादळं’ हा काव्यसंग्रह निसर्गनिर्मित अन् मानवीनिर्मित अशा दोन्ही प्रकारच्या संकटात मानवी मनाला येणारं दौर्बल्य टिपणारा,विविध प्रकारच्या वादळांच्या थैमानांनी कोसळून जाणं चितारणारा आणि शेवटी त्या वादळांना पूर्णपणे परतावून लावण्यासंदर्भात मनाचं ‘हताशपण’ सांगणारा आहे. तसेच ‘मन म्हणजे वादळांची बेवारस घरं असतात’ याचा प्रत्ययही देणार आहे. स्त्री संवेदनांचा, शहर, गावं नि रस्ते यांना वेढून बसणार्या भावसंभबंधाचा, नातेसंबंधांतल्या न गवसणार्या ताणतणावांचा आणि समाजातल्या अदृश्य पुरुषाच्या चेहर्यावर दाटलेल्या दैन्य भावाचा भला थोरला आशयप्रदेश या संग्रहात कवयित्रीने लीलया पेलला आहे. त्यामुळेच या कवितांचा मराठी अनुवाद करणे सहजसोपे नव्हते. पण अनुवादक डॉ. रश्मी यांनी आपल्या मन:प्रकाशात या कविता निरखून पाहिल्या आणि त्या त्यांना आपल्याशा करण्याशिवाय गत्यंतरच उरले नाही. कविता व्हावी लागते, तसेच कवितेचा अनुवादही व्हावा लागतो, हे सत्य डॉ. रश्मी यांचा येथील काव्यानुवाद अनुभवताना पटते.