‘पराजित-अपराजित’ हा वि. स. वाळिंबे यांचा ग्रंथ म्हणजे एक राजकीय ‘रोमान्स’ आहे. फ्रान्सचे १८७१ चे तिसरे प्रजासत्ताक आणि सांप्रतचे पाचवे प्रजासत्ताक या दरम्यानच्या राजकीय संक्रमणाची हकीगत वाळिंबे यांनी या पुस्तकात रोमांचक शॆलीत सांगितलेली आहे. वाळिंबे यांच्या शॆलीची एक खास तहा आहे. प्रसंगातील सारे नाट्य पकडून ते आपल्या साया अंग-प्रत्यंगांसह समूर्त करणे याचा तिला विलक्षण हव्यास आहे; आणि हे नाट्यसुध्दा एका खास छंदाने अवतरते. ‘पराजित-अपराजित’ हा एक दुग्धशर्करा योग आहे. वाळिंबे यांची शॆली आणि फ्रान्सच्या इतिहासाची प्रकृती यांचा येथे साहजिकच संगम झालेला आहे. फ्रान्सचा इतिहास अनेक प्रकरणांच्या रुपरुपांतरांनी गजबजलेला आहे, आणि हे पुस्तक अशा चित्तचकोर प्रकरणांना कधी स्पर्श करीत तर कधी त्यांच्यावर घाव घालीत, कधी त्यांचा दुरुन वेध घेत तर कधी त्यांच्यावरुन अलगद उडी मारीत - पण प्रत्येक वेळी त्याचा एखादा तरी कंगोरा रेखीत प्रवास करते आणि अल्पावधीत द गॉलच्या आधुनिक कालखंडात आणून सोडते. नंतर एका थरारक कहाणीला प्रारंभ होतो. या कहाणीत जळजळीत वास्तव आणि त्याचे रोमांचक उद्रेक यांचे धगधगीत दर्शन होते. - प्रभाकर पाध्यॆ