पंचतंत्राच्या गोष्टी वर्षानुवर्षे मौखिक परंपरेत सांगितल्या जातात. लिखित स्वरूपात प्रथम त्या संस्कृतमध्ये लिहिल्या गेल्या. तेथून अनेक भाषांत गेल्या आणि शतकानुशतके या गोष्टी सांगितल्या जात आहेत. एक राजा असतो. त्याला तीन मुले होती. ते सर्व मुर्ख होते. राजाला मुलांची काळजी वाटायची. राजकुमारांना शिक्षणात गोडी नव्हती. अशा राजकुमारांना शिकविण्याचं काम विष्णू शर्मा नावाच्या पंडितावर सोपविलं. विष्णू शर्मा दररोज राजपुत्रांना एकेक गोष्ट सांगू लागला. गोष्टींची पात्रं मुख्यत: पक्षी आणि प्राणीच होते. राजकुमार या गोष्टीत रंगू लागले. सहा महिन्यांत त्यांना गोष्टीतून सद्गुणांचा आणि सुखी जीवनाचा परिचय झाला. कष्ट, प्रामाणिकपणा, आत्मविश्वास, सहकार, श्रमनिष्ठा, संस्कार, दुसऱ्यास मदत करणे, मित्रप्रेम, मनाचा निश्चय आणि ज्ञानाची साथ मिळाली की माणूस आनंदी जीवन जगू शकतो, हे सारं जीवनाचं सार पंचतंत्राच्या गोष्टीत आढळतं.