...संयत, सोज्वळ तरीही वेदना नि रितेपण या अभिजाताच्या वाटेने जाण्याची असोशी हा सुचिता खल्लाळ यांच्या कवितेचा विशेष आहे.
या कवितांत प्रतिमा, प्रतीकांचा सोस नाही. की आततायी भूमिकेचा घोष नाही. मात्र ‘स्व’च्या शोधाचा एक अनाहत निरंतर ध्यास आहे. पायपोळ या शीर्षकातून अभिव्यक्त होणारी, अत्यंत दाह ओठ गच्च मिटून साहणारी सोशिकता ही अभिजात दु:खाशी नाळ जोडते, तर काही कवितांतून मानवी नश्वरतेचे तत्त्वज्ञान प्रकटते. पावसाच्या कवितांमध्ये ही अनुभूती हळवी होत खोलवर झिरपत राहते आणि सांजकवितांमधून आर्त नि काळीजकातर होऊन स्मृतीभर रेंगाळत राहते. या कवितांमधून फिरून फिरून वेदनेशी सख्य जोडून राहणारी विलक्षण तलखी जितकी व्यक्तिगत असते, तितकीच ती मानुषी होऊन वैश्विकतेशी नाते जोडू लागते. गजबजाटापासून खूप दूरवर निर्जन बेटावर उमलणार्या रानफुलांइतकीच नवतीची तरलता असणारी ही कविता हळवेपणातल्या विशुद्ध निरागसतेने प्रमाणिक राहून तेजस्वी नि प्रखर टोकदार अस्मितेचं भान बाळगून आहे.