“त्या आवाजाची मला एकदम व्याख्याच करता येईना. एखादा भुंगा रागाने जसा गुंगुंगुं आवाज करतो तसला, किंवा रात्रीच्या वेळी एखादं कीटकासारखं जिवाणू खोलीत बंद झालं की जसं भिरभिरत किर्रर्र आवाज करतं-तसला काहीतरी तो आवाज वाढत होता. खोलीतला अंधार, कॉटवर प्रभाकर, हा विलक्षण आवाज. त्या आवाजाचा उगमही कळेना. रोखही कळेना. माझ्या जगाचा तोलच डगमगायला लागला होता. किती तरी गोष्टी करायला हव्या होत्या. धावतधावत जाऊन डॉक्टरांना आणायला हवं होतं, प्रभाकरांना झटपट साहाय्य मिळायला हवं होतं-पण मी जागच्याजागी खिळल्यासारखी झाले होते. तो आवाज गुणगुणत होता, खोलीभर भिरभिरत होता. खोलीत काय होतं? ते कशाचा शोध घेत होतं? माणसाच्या मनात एवढा ताण सोसणं शक्य होतं का? माझं काय होणार आहे तेच मला कळेना. त्या आवाजाने माझ्यावर मोहिनी घातल्यासारखी माझी अवस्था झाली होती. त्या आवाजाचा मागोवा घेत मी एकदा खोलीच्या या कोपऱ्याकडे मग त्या कोपऱ्याकडे अशी पाहत होते-सरकत तो आवाज कॉटकडे आला, कॉटजवळून यायला लागला, अगदी प्रत्यक्ष प्रभाकरांच्या निश्चल शरीराजवळ यायला लागला. आणि थांबला. एकदम थांबला. खोलीत एकदम पसरलेली शांतता भयानक होती.”