मराठवाड्यातील अर्धनागर जीवनाचे प्रत्ययकारी चित्रण करणार्या गो. द. पहिनकर यांच्या ह्या कथा वाचकाला झपाटून टाकतानाच अंतर्मुख होऊन विचार करायला लावतात. सुगम्य तंत्र, विलक्षण योजकता, चित्रलिपी सारखी ओघवती निवेदन शैली, नेटके संवाद, पात्रांचे प्रभावी चित्रण आणि सामान्यांच्या जिव्हाळ्याचे कथानक ह्यामुळे ह्या कथा वाचकांना खिळवून ठेवतात. काळ्या आईवर निस्सीम प्रेम करणारा शेतकरी, स्वत:चे मातृत्व जपण्यासाठी जिवाच्या आकांताने संघर्ष करणारी आई, प्रतिभावान कवीच्या काव्यावर लुब्ध झालेली तरल कोमल मनाची नायिका, उच्चशिक्षित झाल्यानंतर वर्ग भेदातील संघर्षात कैद झालेला नायक ही ह्या कथासंग्रहातील मनाचा ठाव घेणारी काही पात्रे!“ओंजळीतील सूयर्र्” मधील ह्या कथा रसिक वाचकाला एक विलक्षण आनंद देतात, तर कथा समीक्षकांसाठी काही नवीन आव्हानेही उभी करतात. मराठी साहित्याच्या दालनात स्वतःचे एक वेगळे आश्वासक स्थान निर्माण करण्यात हा कथालेखक यशस्वी होईल असा आम्हाला विश्वास वाटतो.