नव्वदोत्तरी कालखंडातील एक महत्त्वाचे कवी म्हणून अशोक कोतवाल हे नाव आता मराठी साहित्यात स्थिर झाले आहे. त्यांचे संवेदनशील मन निर्मितीगंधाशी किती एकरूप झाले आहे, याची प्रचीती त्यांचे गद्य-पद्य लेखन वाचताना जाणवते.
येथे नुसताच गलबला नाही. भोवतालच्या जगातला गलबला कविचे अंतर्मन ढवळून काढतो आहे; तर गलबल्याच्या कोलाहलात अडकलेल्या एकांताचा पेच त्याला चिमटे घेत आहे. यांतून निर्माण होणारी कणव, व्याकूळता, उत्स्ङ्गूर्त प्रातिभ उद्गार घेऊन येथे उचंबळून आली आहे.
आजूबाजूच्या माणसांच्या, जगाच्या आणि संपूर्ण पर्यावरणविषयींच्या त्यांच्या भावना कवितेतून व्यक्त झाल्या आहेत. त्या भावनांना रसिकांच्या मनात नक्की स्थान आहे. कवी कोतवाल यांचे हे प्रातिभदर्शन आहे. कारण त्यांच्या प्रतिभेला आणखी पुढे, आणखी पुढे जाण्याचा केवळ सोस नाही, तर ती सहजवृत्ती आहे.
खर्या कविचे हेच तर लक्षण असते.