“काळ आला होता; पण वेळ आली नव्हती.” हे वाक्य आपण बऱ्याच घटनांच्या संदर्भात वापरतो. काळापुढे कोणाचे काही चालत नाही; पण वेळ हाताशी आहे तोवर आपण खूप काही करू शकतो. कुठल्याही गोष्टीची ‘वेळ’ यावी लागते, तेव्हाच ती पूर्ण होते. हे जरी खरे असले तरी दैनंदिन गोष्टीत आपणास ‘वेळेवर’ सर्व कामे करावी लागतात. त्याकरिता शिस्त, स्वावलंबन आणि सवयही असावीच लागते.आयुष्याचे गणित सोडवताना ‘वेळेचे गणित’ आधी सोडवावे लागते. एकदा हे साध्य झाले, की मग मात्र आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाचा आनंद आपण घेऊ शकतो. व्यक्तींचे स्वभाव व सवयीप्रमाणे यात बदल होतो. त्यामुळे प्रत्येकाचा दृष्टिकोनही वेगवेगळाच असतो; पण काहीही असले तरी ज्याने ‘वेळेशी नाते जोडले’ त्याच्याकडे संधी, यश, प्रसिद्धी आपोआप चालून येते. वेळ साधण्याकरिता वेळेचे नियोजन आवश्यक आहे.वेळेचे नियोजन का? कसे? कुठे? हे महत्त्वाचे नसून ‘अत्र, तत्र, सर्वत्र’ हाच मंत्र त्याकरिता सुयोग्य आहे. वेळेच्या नियोजनाने प्रत्येक क्षणाचे सोने होते. म्हणूनच हे विचार आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा हा ‘वेळेवर’ केलेला प्रयत्न आहे.आपण दैनंदिन कामे करतो,यात आश्चर्य नाही.तेच काम ‘वेळेवर करण्याचीआपल्याला सवय असणे,ही वेळेच्या नियोजनाची गंमत आहेहेच आयुष्याच्या आनंदाचे कारण आहे.