विसाव्या शतकाचा उत्तरार्ध म्हणजे मराठी साहित्याचा गुणात्मक विकास व
परिघात्मक विस्तार करणारे बहारदार सर्जनपर्व!
या प्रभावी सर्जनपर्वाचे व्यामिश्र आव्हान पेलणार्या मोजक्या
मराठी समीक्षकांत प्रा. रा. ग. जाधव मोडतात.
प्रस्तुत 'निवडक समीक्षा' (१९५५-२००४) या पुस्तकात वाङ्मयीन आकलन,
वाङ्मयीन स्फुटे, वाङ्मयीन विमर्श अशा तीन विभागातून
प्रा. जाधवांची उपयोजित व तात्त्विक समीक्षा दिलेली आहे.
त्यांची उपयोजित समीक्षा साहित्यकृतीच्या स्वतंत्र प्रकृतीचे व तिच्यातील जीवनमूल्यांच्या
गर्भित अवकाशाचे भान जपते आणि त्यांची तात्त्विक समीक्षा साहित्याच्या
सामाजिक संदर्भांचे नेटकेपणाने विश्लेषण करते.
प्रा. जाधवांची समीक्षा ही मुख्यत: त्यांच्या स्वत:च्या वाङ्मयीन जिज्ञासेपोटी निर्माण झाली आहे.
या अम्लान जिज्ञासेमुळेच अर्धशतकभर त्यांची समीक्षा ही नवे साहित्यप्रवाह, नवे साहित्यप्रयोग,
नव्या वाङ्मयीन प्रणाल्या आणि संकल्पना यांना सामोरी जात आपली विकसनशीलता टिकवून आहे.
उत्स्फूर्त समीक्षा कुठेतरी उत्स्फूर्त कवित्वाशी जोडलेली असते.
प्रस्तुत 'निवडक समीक्षा' हेही अधोरेखित करते.
विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील मराठी समीक्षेच्या इतिहासात
ही 'निवडक समीक्षा' दखलपात्र ठरावी.