मनुष्य आणि निसर्ग यांचा लढा अनादिकालापासून चालू आहे. या झगड्यात मनुष्याने निसर्गसृष्टीवर जसजसे विजय मिळविले तसतशी मानवजातीची उत्क्रांती होत गेली व रानटी अवस्थेतला माणूस सुधारणेच्या मार्गास लागला. मनुष्याचा आजच्या प्रगतीचे व विकासाचे रहस्य मुख्यत: कशात असेल तर त्याने निसर्गावर मिळविलेल्या विजयात आहे. मात्र या विजयामुळे मनुष्याचा शारीरिकदृष्ट्या अध:पात होत गेला हेही तितके खरे आहे. मनुष्य जसजसा निसर्गाला अंकित करून घेऊ लागला तसतशी निसर्गाची व त्याची फारकत होऊ लागली. निसर्गापासून दूर गेल्यामुळेच आज सुधारलेल्या जगात हजारो, कल्पनातीत रोप उत्पन्न झाले आहेत व या रोगांच्या तडाख्यात न सापडता आपले जीवन निरोगी व सुखकर कसे होईल यासाठी मानवजातीची एकसारखी धडपड चालली आहे. मनुष्यजातीचा जर हा हास थांबवावयाचा असेल तर परत निसर्गाकडे वळल्याखेरीज तरणोपाय नाही. मनुष्याची सर्वांगीण शारीरिक उन्नती व्हावयाची असेल तर त्याने निसर्गाशी एकरूप झाले पाहिजे.