राजकीय इतिहासाची एक अशी तप्त आत्म कहाणी जिने तेलुगू साहित्य विश्वात वादळ निर्माण केले. आंध्रप्रदेशातील माओवादी चळवळीचे संस्थापक दिवंगत कोंडापल्ली सितारामय्या यांची पत्नी कोंडापल्ली कोटेश्वराम्मा यांची ही आत्मकथा आहे. भारतीय स्वातंत्र्यलढा त्यानंतर कम्युनिस्ट पक्षाचा उठाव आणि आंध्रप्रदेशमधील नक्षल चळवळ हे सर्व जवळून पाहिलेल्या, अनुभवलेल्या, या सगळ्याचा एक भाग असलेल्या अशा या लेखिका आहेत. चाळीसच्या दशकात त्या भुमीगत आयुष्य जगू लागल्या. त्यांचे पती कोंडापल्ली यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे आणि साथीने कोटेश्वराम्मा यांना जगण्याची आणि लढण्याची ताकद मिळाली. पण नंतर जेव्हा ते कोटेश्वराम्मा यांना सोडून गेले तेव्हा सगळ्यांना मोठा धक्का बसला. पुढचा एकटीचा वेदनादायी प्रवास कोटेश्वराम्मा यांनी धाडसाने आणि मानाने केला. त्या शिकल्या, नोकरी करू लागल्या. आपल्या नातवंडांना त्यांनी वाढवलं. त्या कविता लिहू लागल्या. एक वैचारिक व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांनी स्वतःचे अस्तित्व स्वत: निर्माण केले. ही त्यांची आत्मकथा म्हणजे अतिशय बिकट परिस्थितीमधील त्यांच्या धाडसाचा आणि दृढतेचा पुरावा आहे. त्यांना जाणवलेल्या माणसांच्या आणि राजकीय संस्थांच्या वृत्ती त्यांनी यात मांडल्या आहेत. भारतीय स्त्रिया कठीण परिस्थितीचा सामना करतात हे सर्वश्रुत आहेच. पण त्या कोटेश्वराम्मा यांच्यासारख्या यशस्वी सुद्धा होतात हे सांगणारी ही आत्मकथा आहे.