नागासाकी ही कादंबरी म्हणजे १९४५मध्ये अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब टाकला, त्याच्या पार्श्वभूमीची, परिणामांची आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या अनेक बाबींची विस्तृत कहाणी आहे. १६ ते २९ जुलै आणि ५ ऑगस्ट १९४५ ते १० ऑगस्ट १९४५ या दिवसांतील राजकीय घडामोडींचं आणि हिरोशिमा, नागासाकीतील लोकांच्या दैनंदिन जीवनाचं चित्रण, असं सर्वसाधारणपणे या कादंबरीचं स्वरूप आहे. क्रेग कोली यांनी संशोधन करून, खूप संदर्भ अभ्यासून, प्रत्यक्षदर्शींच्या मुलाखती घेऊन ही कादंबरी सिद्ध केली आहे. जपानने पर्ल हार्बरवर केलेल्या हल्ल्याचा सूड म्हणून अमेरिकेने हा बॉम्बहल्ला केला. त्या हल्ल्यानंतर या शहरांमध्ये झालेल्या मृत्यूच्या तांडवाचं आणि जखमी लोकांच्या वेदनांचं प्राधान्याने चित्रण करणारी ही कादंबरी जरूर वाचली पाहिजे.