नाटक बघताना, वाचताना आणि करताना मनात अनेक प्रश्न येतात. जितक्या विविध तर्हेची नाटकं अनुभवू, तेवढे प्रश्न वाढत जातात. नाटकाचे निरनिराळे प्रकार कुठले आहेत, ते सादर कसे होतात आणि त्यांचा परिणाम काय होतो ह्याविषयी प्रतिक्रिया देऊन, त्यातून उद्भवणार्या प्रश्नांची चर्चा ह्या पुस्तकात केली आहे. नाट्यसंहिता-चिकित्सेबरोबर नाट्यप्रयोग-विश्लेषणालाही तेवढंच महत्त्व देण्यात आलं आहे. निर्मिती आणि आस्वादाशी संबंधित वेगवेगळ्या संकल्पना व विचारव्यूह ह्याबद्दलचं हे विवरण नेमक्या उदाहरणांमुळे बळकट आणि सुस्पष्ट झालं आहे. नाटकाच्या सौंदर्यशास्त्रीय प्रश्नांपर्यंत पोचण्याचा हा एक आस्थेने केलेला प्रयत्न आहे. नाटककार, नाट्याभ्यासक, नाट्यशिक्षक डॉ. राजीव नाईक ह्यांचा हा नाट्यविषयक लेखसंग्रह मननीय आणि संग्राह्य ठरावा असा आहे.