दररोज तर्र होऊन शाळेत येणाऱ्या गायकवाड गुरुजींना मॅट्रिकच्या मुलांनी चांगलाच धडा शिकवला. त्यांना झिंगलेल्या अवस्थेत वर्गातून बाहेर काढले. सर्वांसमोर भरपूर दारू पाजली. बेदम बदडले आणि विवस्त्र अवस्थेत घरी पाठविले. हा धडा घेतल्यानंतरही सर सुधारले नाहीत. अभ्यास करण्यासाठी आपल्या घरी येणाऱ्या एका मॅट्रिकच्या विद्यार्थिनीला त्यांनी ठेवून घेतले. गावात काही दिवस वादळ उठले. सर्वांनी तिच्या आईवडिलांची बदनामी केली; पण सरांना कोणी दोष दिला नाही. दुसरे भिसे सर. सर गृहस्थी होते; पण मर्यादा ओलांडून त्यांनी एके दिवशी वर्गातील मुलीला पळवून नेले. एक वर्षानंतर मुलगी एकटीच गावी परत आली. तेव्हा ती अशक्त झाली होती. आजारी होती. गरोदर होती. तिच्या आईवडिलांनी तिला जवळ केले; पण गावकऱ्यांनी सळो की पळो करून सोडले. त्या मुलीनं गावाजवळच्या एका सरकारी विहिरीत आत्महत्या केली. पुढे सहा महिन्यांच्या अंतराने तिची आई धक्का असह्य होऊन मरण पावली. वडीलही एका वर्षात वारले. त्या मुलीचा एक लहान भाऊ मागे उरला आहे. गावात भीक मागत फिरतो. तोही वेडा झाला आहे.या सर्व प्रकरणांपासून गावातील लोकांनी मुलींना शाळेत पाठविणं बंद केलं आहे.(‘माझी शाळा-कालची, आजची’ कथेमधून)