‘तुम्हाला भारत माहीत करून घ्यायचा असेल तर विवेकानंद वाचा.’– गुरुदेव रवींद्रनाथ टागोर “उत्तिष्ठत् जाग्रत प्राप्य वरान्निबोधत ।” अर्थात उठा, जागे व्हा आणि आपली ध्येयप्राप्ती होईपर्यंत थांबू नका, असा ओजस्वी संदेश देणाऱ्या स्वामी विवेकानंदांचे जीवन आणि कार्य आजच्या काळातही अत्यंत मोलाचे आणि प्रेरणादायी आहे. अंधारात चाचपडणाऱ्या जनतेला त्यांनी उन्नतीच्या प्रकाशाची वाट दाखविली. परतंत्र भारताला स्वाभिमानाने जगायला शिकवले. आपणच आपला उद्धार केला पाहिजे हे तत्त्व त्यांनी साऱ्यांना कळकळीने सांगितले. युरोप, अमेरिकेत गाजलेल्या त्यांच्या भाषणांनी वेदांताची महती आणि भारतीय संस्कृतीचे महत्त्व जगासमोर प्रतिपादित केले. सर्व धर्मांमधील मूलभूत समान तत्त्वे सांगून भारतीय वेदांताची श्रेष्ठता सिद्ध केली. त्यांचे ओजस्वी विचार त्यांच्याच शब्दांत म्हणजे ईशकृपाच.त्यांनी भारताच्या प्राचीन इतिहासाचा गौरव केला आणि तत्कालीन लाचारी व दीनवाण्या जीवनाचा धिक्कार करीत ताठ मानेने जगण्याचे आवाहन केले. मानवतेचे महान पुजारी, समाजवादी विचारधारेचे प्रवर्तक, वेदांतधर्माचे अनुयायी, स्त्री-जाती व प्राचीन संस्कृतीचे सजग पहारेकरी, भारतीय अस्मितेचे उद्घोषक अशा स्वामीजींचे प्रेरक विचार वाचकांना नवचैतन्य देण्याबरोबर जगण्याचा नवा दृष्टिकोन देतील.