मराठीतील गद्य निवेदनात्मक वाङ्मयप्रकारांमध्ये `लघुनिबंध` या वाङ्मयप्रकाराचे अनेक कारणांकरिता महत्त्व आहे. आत्मनिष्ठा, अभिव्यक्तीतील प्रयोगशीलता, आटोपशीरपणा, इत्यादी कारणांमुळे मराठी गद्यलेखनाच्या विकासाला हा प्रकार पोषक ठरलेला आहे. `लेखक-मी`च्या ‘मतप्रदर्शना`कडून त्याच्या `आत्मदर्शना`कडे प्रवास होत होत आज हा प्रकार ललितगद्याच्या नव्याच रूपात वावरता-बहरताना दिसत आहे. प्रस्तुत ग्रंथामध्ये डॉ. आनंद यादव यांनी मराठी लघुनिबंधाचे जन्मपूर्व रूप, लघुनिबंध म्हणून असणारे त्याचे एका विशिष्ट कालखंडातील अव्वल रूप आणि आजच्या ललितगद्यामध्ये परिणत झालेले त्याचे नवे रूप या तीनही अवस्थांचा ऐतिहासिक, चिकित्सक शोध घेतलेला आहे.प्रस्तुत ग्रंथास त्यामुळेच एका वाङ्मयप्रकाराचा ऐतिहासिक आलेख मांडणा-या शोध-प्रबंधाचेच रूप प्राप्त झालेले आहे. तरीही मराठी लघुनिबंध व ललित गद्य यासंबंधीची आपली निरीक्षणे डॉ. यादव येथे साधेपणाने- तरीही ठामपणे मांडताना दिसतात. एका वैचारिक शिस्तीने, पण कमालीच्या आटोपशीरपणे लिहिला गेलेला हा ग्रंथ मराठी वाङ्मयाच्या अभ्यासकांना निश्चितच दिशादर्शक वाटेल.