स. 1920 ते 1990 या कालखंडातील ग्रामीण काव्याची ठळक वैशिष्ट्ये आणि मर्यादा पुढीलप्रमाणे सांगता येतील. 1. आधुनिक काव्याच्या प्रारंभापासून ते 1920 पर्यंतच्या काळातील मराठी कवितेत ग्रामीण जीवनाचे चित्रण अपवादात्मक स्वरूपात आढळते. 2. या काळातील केशवसुत व इतरांच्या कवितेत अपवादाने येणारे ग्रामजीवन चित्रण हे केवळ बालपणातील आठवणी, वर्ण्य विषयाची पार्श् वभूमी . कारणांनी आलेले दिसते. 3. ग्रामीण (जानपद) कवितेच्या प्रारंभीच्या काळातील कवी आणि रसिक वर्ग शहरी भागातील होता. या काळात नागर कवींच्या हाती ग्रामीण (जानपद) कविता गेल्याने केवळ ’नवीन काव्यप्रकार’ म्हणून ’हौसेखातर’ या काव्याचे लेखन झालेले आहे. कुठल्या तरी बाह्य पे्ररणेने एखादे कथानक घेऊन चंद्रशेखर, गिरीश यांसारख्या कवींनी ग्रामीण जीवनावरील खंडकाव्याची निर्मिती केली. त्यासाठी त्यांनी स्वभावदर्शन, प्रसंगवर्णनाच्या तुकड्या-तुकड्यांना ग्रामीण बोलीच्या आधाराने सांधण्याचा प्रयत्न केला. त्याबरोबरच ग्रामीण जीवनातील एखादा विषय - प्रसंग- व्यक्ती घेऊन या काळातील नागर कवींनी नागर रसिकांना वेगळ्या अशा ग्रामीण जीवनाचे दर्शन घडविण्याच्या हेतूने सजविलेली स्फुट कविता साकार केली. वेगळ्या अशा जानपद जीवनाकडे कवींची दृष्टी वळण्यामागे रविकिरण मंडळकालीन कवितेतील तोचतोपणाला कंटाळलेल्या रसिक वर्गाला रुचिपालट करून देणे, हा उद्देश दिसतो.