मालगुडी डेज’ आणि ‘स्वामी’ यांसारख्या दूरदर्शन मालिकांमुळे आर.के. नारायण प्रसिद्धीझोतात आले. त्यांच्या ‘द गाईड’ या कादंबरीवर आधारित असलेला ‘गाईड’ हा चित्रपट विशेष गाजला. आर.के. नारायण यांची खासियत म्हणजे अत्यंत सामान्य माणसाचं रोजच्या आयुष्याचं चित्रण सहज, ओघवत्या आणि मार्मिक विनोदातून रेखाटायची कला! त्यांच्या कथा एकाच वेळी मनाला स्पर्शूनही जातात आणि निखळ विनोदानी हास्याची कारंजीही उडवतात.
अशाच गाजलेल्या पुस्तकांपैकी काही निवडक पुस्तकांचा मराठी अनुवाद ‘रोहन प्रकाशन’तर्फे प्रसिद्ध करत आहोत.
एखाद्या खलनायकाप्रमाणे भासणार्या ‘वासू’ या व्यक्तिरेखेभोवती सर्व कथा फिरते. भिडस्त स्वभावाच्या आणि कोणत्याही गोष्टीला ‘नाही’ म्हणून शकणार्या नटराजला या वासूमुळे किती चित्र-विचित्र प्रसंगांना सामोरं जावं लागतं याचं मार्मिक विनोदी शैलीतून केलेलं हे वर्णन आहे. टॅक्सीडर्मीस्ट वासू मेंपीच्या जंगलातल्या प्राण्यांची बेछूट शिकार करून त्यांच्या शरीरात पेंढा भरून विकत असतो. अनेक कृष्णकृत्य करणारा वासू देवळातल्या महोत्सवासाठी लोकांकडून बळजबरीने वर्गणी गोळा करतो आणि कळस म्हणजे देवळातल्या कुमार हत्तीला पैशांसाठी मारायचा घाटही घालतो! नटराज-देवदासी रंगी, शास्त्री आणि त्याच्या कंपूतल्या मित्रांच्या साहाय्याने या वासूला कसा शह देतो याचं उत्कंठावर्धक आणि रहस्यपूर्ण वर्णन आर.के. नारायण यांनी केलं आहे.