या पुस्तकातील आशयामुळे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाच्या अध्ययनाला एक वास्तव अधिष्ठान प्राप्त होत आहे; महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्या सर्वांगीण संबंधांचा शोध घेण्यासाठी निर्मलमनस्क अभ्यासकांना विधायक प्रेरणा प्राप्त होत आहे. डॉ. कलबुर्गी यांनी आपल्या अध्ययनाची व्यापक पूर्वपीठिका संक्षेपाने सिद्ध करून, अध्ययनसामग्रीचे पूर्वाधार, शिलालेखांच्या उपलब्धीचे क्षेत्र, हे शिलालेख कोरविणार्या राज्यकर्त्यांची कुळे, त्यांनी ज्यांना दाने दिली, त्यांचे श्रद्धाविषय, लेखांतून प्रकटलेली भौगोलिक, धार्मिक, आर्थिक व सामाजिक स्थिती,व्यक्तिनामे - आडनावे - ग्रामनामे यांच्या अवलोकनातून सामाजिक-सांस्कृतिक इतिहासावर पडणारा प्रकाश, इत्यादी शोधांगांचा धावता, पण मार्मिक परामर्ष घेतला आहे. खरे तर हा एका प्रदीर्घ शोधनिबंधाचाच पुस्तकरूपात सादर केलेला देखणा मुद्राविष्कार आहे. - रामचंद्र चिंतामण ढेरे