डॉ. सुहासिनी इर्लेकर हे साहित्य, समाज आणि संस्कृती ह्या क्षेत्रात एकरूप झालेले व्यक्तिमत्व केवळ मराठवाडाच नव्हे; तर संपूर्ण महाराष्ट्रालाच ह्याची जाणीव आहे. राष्ट्र सेवा दलाच्या संस्कारातून त्यांचे व्यक्तिमत्व आकारास आले. अध्ययन आणि अध्यापन क्षेत्रात त्यांनी नावलौकिक मिळविला तर सर्व वाङ्मय प्रकारांत त्यांनी दर्जेदार लेखन केले आहे. विविध पुरस्कारांनी व सन्मानांनी त्यांचा गौरवही झाला आहे. ह्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे त्या समंजस व सुसंस्कृत गृहिणी होत्या. अशा बहुमुखी प्रतिभा असलेल्या व बहुआयामी व्यक्तिमत्वाच्या सुहासिनीताईंना त्यांच्या पश्चात एक आदर्श व्यक्ती म्हणून समजून घेण्यासाठी हा ग्रंथ उपयुक्त ठरेल. हा ग्रंथ म्हणजे केवळ स्मृती नाहीत तर एका ज्ञाननिष्ठ,मूल्यनिष्ठ व सत्त्वसंपन्न लेखिकेला समजून घेण्याचा प्रयत्न आहे. त्यांच्याभोवती असलेले कुटुंबीय, सहकारी, साहित्य क्षेत्रातील त्यांचे समकालीन प्रतिभावंत, मित्र-मैत्रिणी आणि सेवादलातील कार्यकर्ते यांनी अतिशय मन:पूर्वक त्यांचे व्यक्तिमत्व उभे केले आहे. त्यातील सर्वच लेखक जाणकार व अधिकारी आहेत हे फार महत्त्वाचे.