जनलोकांच्या सेवेमध्ये ईश्र्वराच्या पूजेचे सार आहे, हे ओळखून गाडगेमहाराजांनी डोंगराएवढे विधायक कार्य उभे केले. कीर्तन प्रबोधनाची पताका खांद्यावर घेऊन जनउद्धाराची वाट दाखविली. हातात खराटा घेऊन गाव स्वच्छ केला तर कीर्तनात उभे राहक्तन लोकांची मनेही स्वच्छ केली. समाजजीवनात वावरताना जे जे अनुभवले त्यातूनच जीवनाचे तत्त्व बनले. त्याच तत्त्वाचा पुरस्कार करीत गाडगेबाबांचे जीवनदर्शी तत्त्वज्ञान उदयास आले. विचारांना आचाराची जोड देऊन, कळणारी भाषा आणि पेलणारे तत्त्व डोळसपणे मांडले. लोकशिक्षकाची भूमिका घेऊन खरे लोकशिक्षण घडविणारे गाडगेमहाराज, ही केवळ एक व्यक्ती नाही, विभूती नाही, तर ते एक महान प्रबोधनकारी लोकविद्यापीठ आहे.