डॉ. रा. चिं. ढेरे यांनी संशोधनसाधनांचा प्रचंड विस्तार केला आणि त्यांतून निरनिराळ्या ज्ञानशाखांच्या विभाजनरेषा पुसून, ज्ञानाच्या अखंडपणाचा सातत्याने आणि भरीव प्रत्यय दिला.
त्यांच्या कामामधून त्यांनी अभिजन-संस्कृती आणि बहुजन-संस्कृती यांच्यामधली दरी मिटवली आणि अभिजनांच्या सांस्कृतिक महात्मतेचे पोषण लोकसंस्कृतीने कसे केले आहे, याचा उलगडा केला. संशोधनाची सामाजिक अंगे त्यांनी निर्भयपणे तपासलीच, पण बहुजनांच्या उत्थानाच्या प्रक्रियेचे महत्त्वही सातत्याने अधोरेखित केले.
सांस्कृतिक इतिहासातल्या अनेक प्रश्नांची त्यांनी उकल केली. अनेक रिकाम्या जागा भरून काढल्या, मराठी धर्मजीवनाचा समग्र पट धांडोळला आणि हे काम करताना भारतीय संस्कृतीशी असलेला मराठीचा अनुबंधही स्पष्ट केला.
हा ग्रंथ म्हणजे डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या अशा कार्याचे अनेकांनी घडविलेले प्रातिभ दर्शन आहे.