आज मराठीमध्ये लोकसंस्कृती आणि तिची अंगे-उपांगे यांचे जे मोजके आणि मान्यवर अभ्यासक आहेत; त्यामध्ये प्रा. द. ता. भोसले यांचा समावेश करावयास हवा. लोकसंस्कृतीवर त्यांचे तीन-चार ग्रंथ प्रसिद्ध झालेले आहेत; आणि मराठी वाचकांनी त्यांचे चांगले स्वागतही केलेले आहे. या ग्रंथात लोकसंस्कृतीमधील लोप पावत चाललेल्या वस्तू, विधी आणि परंपरा यांचे त्यांनी सांस्कृतिकदृष्ट्या जसे दर्शन घडविले आहे;तसेच लोकसंस्कृतीची वैशिष्ट्ये, तिच्यात झालेले बदल आणि आजच्या जागतिकीकरणाच्या संदर्भात मीमांसाही केलेली आहे. त्यामुळे लोकसंस्कृतीचे वाचक अभ्यासक आणि संशोधक यांना हा ग्रंथ नक्कीच उपयोगी पडेल असे वाटते. लोकसंस्कृतीमधील नानाविध बाबींचा त्यांनी करून दिलेला लौकिक आणि सांस्कृतिक परिचय नव्या पिढीला आपल्या पूर्वजांची ओळख करून देणारा ठरेल, यात शंका नाही.