आपली मराठी भाषा जगातील समृद्ध भाषांपैकी एक आहे. ‘अमृतातेहि पैजा जिंकण्याचा’ विश्वास असलेली ही भाषा सुंदर आहे. मराठी मातीचा अस्सल दरवळ आपल्या भाषेच्या अक्षरा अक्षरांतून झिरपत असतो. आपल्या विचारांच्या अभिव्यक्तीसाठी आपण हीच भाषा लिखित स्वरूपात वापरतो. ती बिनचूक असेल तर वाचणाऱ्यापर्यंत आपले म्हणणे अधिक नीटसपणे, नेमकेपणाने पोचू शकेल. अलीकडे आपल्या मराठी भाषेला इतर भाषांच्या प्रभावाचे, बेफिकीरपणाचे आणि ढोबळ चुकांचे ग्रहण लागले आहे, असे वाटते. काही साधे-सोपे नियम जाणून घेतले आणि भाषेचा थोडा अभ्यास केला तर यातल्या अनेक चुका टाळता येऊ शकतील. मराठी लिहिणारे सर्व जण, मराठीचे विद्यार्थी, मराठी वृत्तपत्रांतील पत्रकार, जाहिरातलेखन करणारे संहितालेखक, वेगवेगळ्या दृकश्राव्य माध्यमांसाठी लेखन करणारे लेखक, एमपीएससी यूपीएससीत भाषा विषय अभ्यासणारे विद्यार्थी, समाजमाध्यमांवर लिखाण करणारे सर्व हौशी लेखक या सर्वांना या पुस्तकाचा नक्कीच उपयोग होईल.