साहित्यविश्वात अलिकडे बोकाळलेल्या अपप्रवृत्तींची ही अफलातून व्यंगचित्रं. एका संवेदनशील चित्रकाराने रेखाटलेली; पण कुंचल्यातून नव्हे तर लेखणीतून उतरलेली. कितीकांच्या टोप्या साळसूदपणे उडवणारी... कवितेऎवजी कवयित्रीशी सूत जमवू पाहणार्या लंपट समीक्षकाची. एकीकडे इतिहासात रमल्याचा आव आणून दुसरीकडे वर्तमानावर ‘अर्थपूर्ण’ नजर ठेवणार्या कादंबरीकाराची. लाडंलाडं बोलून गळ्यात पडणार्या बिनधास्त कवयित्रीची. शिवराळ कवितेचा शेणसडा घालून स्वत:भोवती मात्र आरती ओवाळून घेणार्या कवीची. लेखकाचा सफाईने गळा कापणार्या पोचलेल्या प्रकाशकाची. पुरस्कार ‘फिक्स’ करून मग पुस्तक लिहायला घेणार्या चापलूस लेखकाची. ‘श्राध्दां’जलीची साग्रसंगीत(पूर्व) तयारी करणार्या प्रसिध्दी-माध्यमांची; स्वयंघोषित सांस्कृतिक मुखंडांची. ...आणि इतरही अनेकांची. ‘यातल्या कुठल्या व्यक्तिरेखा काल्पनिक वाटल्या तर तो दोष मूळ व्यक्तींचा.’ ही रविमुकुल यांची टीप बरंच काही सांगून जाते. - सुबोध जावडेकर