गेल्या ४० वर्षांत राज्य विधानसभेची धरून, दहा निवडणुका मी लढवल्या. कधी चुरशीच्या, कधी थोडया मतांनी, कधी लाख मतांनी, तर कधी बिनविरोध अशा सर्व निवडणुका मी जिंकल्या आहेत. प्रत्येक निवडणुकीतील अनुभव वेगळा, राजकीय कसोटया वेगळ्या, त्यावेळचे विरोधी राजकीय पक्षही वेगळे, अशा होत्या. पण १९४६ सारखी सर्वमान्य निवडणूक कधीच झाली नाही. ही आणि नाशिकची पार्लमेंटची निवडणूक सोडली, तर माझ्या सर्व निवडणुका मोठया वादळी होत्या. प्रतिपक्षांनी आपापल्या मुलुखमैदानी तोफा डागल्या होत्या. अभद्र आणि कटुतेच्या प्रचाराचा त्यांनी कळस केला. या सर्व निवडणुकांत माझा सर्वात मोठा प्रचारक माझा मीच असे. संभाषणशैलीतील मनमिळाऊ, सुसंस्कृत, तत्त्वनिष्ठ आणि प्रांजळ प्रचार ही माझी मोठी शक्ती आहे, असे माझ्या लक्षात आले; आणि या सर्व वादळात जनतेच्या आशीर्वादाने व माझ्या कार्यकर्त्या मित्रांच्या संघटित सहकार्याने मी अपराजित ठरलो. लोकशाहीच्या राजकारणात याच्यापेक्षा अधिक काय अपेक्षा करायची!