‘खांदेमळणी’ कथासंग्रहातून बदलत्या ग्रामजीवनात होणारी घुसमट संग्रहातील सातही कथांच्या केंद्रस्थानी आहे. ही घुसमट जशी निसर्गनिर्मित आहे तशी मनुष्यनिर्मितही आहे. या चक्रात ग्रामीण माणूस भरडून निघत आहे. ‘परवड’ कथेतला गुजाण्णा हा त्यांच्यापैकी एक. अपुरी जमीन,पावसाचे प्रमाण कमी, शेतीतील नापिकी अशा परिस्थितीत कर्ज काढून शेतीला व्यवसायाची जोड द्यावी तर तिथंही जीवघेणी स्पर्धा, त्यामुळे हा व्यवसायही त्याला खड्ड्यात घेवून जातो. एकंदर ‘खटारा’ झालेल्या गावगाड्याचा ठणूक या सार्या कथांतून वाचकास अंतर्मुख करतो. महिलांच्या राखीव जागेचा लाभ घेण्यासाठी बायकोला राजकारणात आणलं जातं, पण तिला यशस्वी करण्यात अपयश आलं तर भिंतीला थापलेली ‘गवरी’ गळून पडते तसं तिलाही त्याच्यापासून गळून घ्यावं लागतं. पंचङ्गुला अशा स्त्रियांची प्रतिनिधी आहे. खांदेमळणीतल्या कथा वाचून संवेदनाक्षम माणूस सुन्न होतो आणि विजय जावळे यांच्या कथांचे हेच यश आहे.
- रा. रं. बोराडे