‘...तुमच्याआमच्या क्षणभंगुर अनुभूतीतले सौंदर्य टिपून घेण्याचे आणि त्याला चिरंजीव रूप देण्याचे सामथ्र्य केशवसुतांच्या प्रतिभेत आहे. जीवनाच्या उगमापासून मुखापर्यंत स्वैर संचार करण्याचे साहस तिने प्रकट केले आहे. विशाल मानवी संसार ज्या खोल पायावर उभारला गेला आहे, त्याचा वेध जितक्या अचूकपणे तिने घेतला आहे, तितक्याच समर्थपणे तिने त्याच्या अंतिम मूल्यांचाही आविष्कार केला आहे. हा संसार सर्व बाजूंनी काव्याने वेढला गेला आहे, एवढेच नव्हे, तर बाह्यत: खडकाळ भासणाNया त्याच्या अंतरंगातूनही काव्याचे अमृतझरे वाहत आहेत, याची जाणीव त्यांनी पदोपदी प्रकट केली आहे. केशवसुतांच्या कवितेने तुमच्याआमच्या— जगातल्या प्रत्येक माणसाच्या— किती तरी मुक्या सुखदु:खांना बोलायला लावले आहे आणि आंधळ्या प्रीतीला व पांगळ्या आकांक्षांना लीलेने आशेच्या शिखरावर चढवले आहे. माळरानावर उपेक्षित स्थितीत पडलेल्या शिलेवरला अदृश्य, पण अद्भुत लेख ती वाचते, पायांखाली तुडवल्या जाणाNया अंगणातल्या रांगोळीतले उदात्तत्व ती जाणते आणि अज्ञाताच्या पडद्यामागे लपलेल्या जीवनरहस्याचे अंधूक तरी दर्शन घडावे, म्हणून ती तडफडते. ती जितकी आत्मनिष्ठ तितकीच विश्वप्रेमी, जितकी हळवी तितकीच बंडखोर, जितकी उदास तितकीच उदात्त, जितकी करुण तितकीच कठोर आहे. ती मनुष्याच्या आत्म्याची िंकचित ओबडधोबड, पण अतिशय सजीव अशी प्रतिमा आहे...’