कवितेसमक्ष’ हे प्रा. चंद्रकान्त पाटील यांच्या कवितेवरील लेखांचे व टिपणांचे पुस्तक आहे. आत्मीयतेने कविता वाचणे, कवितेच्या गाभ्यात शिरण्याचा प्रयत्न करणे, कवितेविषयीची जाण वाढवण्याचा प्रयत्न करणे, कवितेवर अनेक अंगांनी लेखन करणे, आपल्या भाषेतील महत्त्वाच्या कविता परभाषेत नेणे व परभाषेतील कविता आपल्या भाषेत अनुवादित करून सांस्कृतिक देवाणघेवाण करणे, कवितेच्या व्यापक परिदृश्याची माहिती करून घेणे, कवितेच्या सूक्ष्म भाषिक जंजाळात शिरून कवितेचे मर्म जाणून घेणे अशा अनेक पातळ्यांवरून पाटील हे गेल्या ५० वर्षांपासून कवितेशी बांधलेले आहेत. प्रस्तुत लेखसंग्रहात याची साक्ष सर्वसामान्य वाचकांना व कवितेच्या अभ्यासकांना दिसेलच. वनस्पतीविज्ञानाचे निवृत्त प्राध्यापक चंद्रकान्त पाटील कवी, समीक्षक, सुजाण अनुवादक, संपादक असून त्यांची मराठी व हिंदी अशा दोन्ही भाषांत सतत ये-जा चालू असते. दोन्ही भाषांत मिळून आत्तापर्यंत त्यांची सुमारे ४५ पुस्तके प्रकाशित झालेली असून त्यांना राष्ट्रीय व राज्यस्तरावरील अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे.