‘फुलांचा सुगंध हा फक्त फुलांसाठीच नसतो, तर फुलांपेक्षासुद्धा जास्त तो इतरांसाठी असतो!’ कवितेचेही असेच असते. ती कवीला स्फुरेपर्यंत कवीची असू शकते; पण त्यानंतर कवितेची अनुभूती इतरांनाही मिळावी, यासाठी कवी ती सादर करतो, तीही केवळ रसिकांसाठीच! थोडक्यात, कविता ही कवीइतकीच विंâबहुना ती कवीपेक्षाही जास्त रसिकाची असते. ती दोघांची असते, म्हणून ‘कविता दोघांची...’ या कवितांमध्ये उत्तुंग कल्पनेच्या भरा-या किंवा जीवनातील कूट प्रश्नांची उकल वगैरे काही नाही. सामान्य माणसाला जीवन जगत असताना जो अनुभव प्रकर्षाने येतो, तो साध्या शब्दांत ग्रथित केला आहे. कविता वाचताना रसिकाला वाटेल की, ‘अरेच्चा! मलाही असंच वाटत होतं, मलाही असंच म्हणायचं होतं.’ हेच या कवितांचे गुणविशेष आहे, म्हणून ही ‘दोघांची कविता!’