प्राचीन मराठी वाङ्मयातील शाहिरी वाङ्मयाची काव्यपरंपरा राम जोशी यांच्यापासून सुरू होते. आपल्या काव्यकलेने व शब्दचातुर्याने त्यांनी स्वत:चा विशिष्ट ठसा उमटवला आहे. विद्वत्तेची पूजा करणार्या कुटुंबात जन्मलेल्या ह्या पंडित कवीने लावणीला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. त्यांच्या कवितेतून त्याकाळची समाजमनाची स्पंदने व विकार-विचारांची ठळक प्रतिबिंबे त्यांच्या कवितेत आढळतात. अशा महाकवीच्या जीवनावर कादंबरी साकार करणे हे अवघड काम कवीप्रवृत्तीच्या लक्ष्मीनारायण बोल्ली यांनी उत्तम केले आहे. मूळ कथा, संवाद, प्रसंग, नातेसंबंध व तत्कालीन समाज ह्यांचे चित्रण केवळ काव्यमयच नाहीतर अधिक चित्रमयही आहे. विद्वत्तेची परंपरा व तमासगीरांचे जीवन अशा भिन्न पातळीवर राम जोशींचे आयुष्य कादंबरीतून व्यक्त करणे अवघड आहे. परंतु कवी लक्ष्मीनारायण बोल्ली यांनी हे अतिशय प्रतिभेने साकार केले आहे, त्यामुळे ही कादंबरी केवळ वाचनीय नाही, तर एका शाहीर-पंडिताला समजून घेण्यासही उपयुक्त ठरणारी आहे