त्याने डोळे विस्फारून पाहिले. मगाचेच गाव होते ते. आईचा पदर धरून गोजिरवाण्या बालकाने खेळत राहावे तसे ते त्या हिरव्या झाडीच्या आडून हसत होते. ....आणि आशीर्वादाकरिता तपस्व्याने उंच केलेल्या हातासारखा दिसणारा तो देवळाचा कळस! माणसाचे खरे, भलेबुरे स्वरूप घराच्या चार भिंतींनाच ठाऊक असते. त्या भिंतींना कान असतात; पण तोंड नसते म्हणूनच माणसाचा आब अजून जगात कायम राहिला आहे. पै-पैने जशी माया जोडावी लागते, तशी शब्दाशब्दाने, कृतीकृतीने माया लावावी लागते.