'सुमारे सात दशकांपूर्वी आशिया खंडातल्या दोन देशांमध्ये एक शर्यत सुरू झाली. ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून भारत स्वतंत्र झाला आणि चीनमधील यादवी युद्धात साम्यवादी विजयी झाले. पंडित जवाहरलाल नेहरू आणि माओ झेडाँग हे दोन नेते आपापल्या देशांचे नवे नेते झाले. प्रारंभी काही काळ त्या दोघांमध्ये मैत्री नांदली खरी; पण थोड्याच काळात दोघांचीही वेगवेगळ्या मार्गांनी वाटचाल सुरू झाली आणि मग कळत-नकळत स्पर्धासुद्धा! मतभेदांना सीमासंघर्षाचीही जोड मिळाली. चीनमधील हुवूâमशहांनी सुधारणावादी भूमिका स्वीकारली, काही मूल्यं पायदळी तुडवली; पण आर्थिक-औद्योगिक प्रगतीचा वेग प्रचंड वाढवला. महासत्ता बनवण्याच्या अगदी जवळ तो देश जाऊन पोचला... भारतात लोकशाही समाजवादाचा प्रयोग बरीच वर्षं चालू राहिला, नेते आले-गेले, नियोजनपूर्वक प्रगतीच्या योजना जाहीर झाल्या-फसल्या आणि तरीही जागतिकीकरणाच्या वेढ्यात उदार धोरणं स्वीकारणं भारतीय नेत्यांनाही भाग पडलं. आता हा देशही प्रगतीच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन ठेपला आहे. अशा स्थितीत बरीच पुढची मजल मारलेल्या चीनशी त्याची तुलना होणं स्वाभाविक आहे. दोन्ही देशांच्या प्रमुख नेत्यांची, त्यांच्या ध्येयधोरणांची, त्यांच्या यशापयशाची, देशांमधील अटळ चढउतारांची आणि भविष्यामधल्या शक्याशक्यतांची तुलना करीत सांगितलेली ‘त्या’ शर्यतीची ही माहितीपूर्ण कथा. '