‘कळशीच्या तीर्थावर’ हे चरित्रही नाही आणि आत्मचरित्रही नाही. स्मृतींच्या आडव्याउभ्या ताण्याबाण्यांनी विणलेल्या बहुरंगी सणंगासारखे या पुस्तकाचे स्वरूप आहे. आणि या सगळ्या आठवणी सांगताहेत खुद्द गदिमांचे कनिष्ठ चिरंजीव – शरत्कुमार माडगूळकर. ओघवत्या रसाळ भाषेचा वारसा शरत्कुमार यांना लाभलेला आहे. प्रसन्नता हाही त्यांच्या लेखणीचा गुणविशेष.. मुक्त कथनाचा हा साहित्यप्रकार हाताळताना अनेक छोट्यामोठ्या व्यक्तिरेखा त्यांच्या निवेदनातून नीटसपणे साकार होताना दिसतात.
गदिमा म्हणजे मराठी सारस्वतांचे एक उत्तुंग झाड. उभ्या महाराष्ट्राचे लोकोत्तर भूषण. त्यांच्या सहवासात अनुभवाला आलेल्या आनंद, विनोद, दु:ख, कारुण्य, विरह, वेदना अशा कितीतरी भावच्छटा आविष्कारताना शरत्कुमारांची लेखणी विलक्षण तादात्म्य पावते: आत्मलीन होते.
माडगूळकर घराण्यातील कौटुंबिक व लौकिक घटनांचा सत्यदर्शी वेध घेणारे मराठीतील हे एक प्रांजल पुस्तक ठरेल, याते संदेह नाही.