सत्कृत्य काय किंवा दुष्कृत्य काय, माणसानं स्वत:ला केंद्रस्थानी ठेवून रचलेल्या केवळ व्याख्या आहेत सगळ्या. जे तुला सत्कृत्य वाटतं त्यालाच दुसरा कोणी दुष्कृत्य म्हणेल. स्वाभाविक आहे ते. प्रत्येक जण आपापल्या समजुती- नुसार आपापले हित लक्षात घेऊन एखाद्या गोष्टीला त्या त्या वेळी सत्कृत्य किंवा दुष्कृत्य ठरवत असतो. कालपुरुष म्हणजे केवळ वर्तमान नव्हे. म्हणूनच तुमच्या समजुतीनुसार आणि तुमच्या हिताच्या दृष्टीने केलेल्या कृत्याची तो दखल घेत नसतो. तो पराकोटीचा निर्विकार असतो. त्याच्या वाट्याला आलेलं कर्म एकच- कशाचीही दखल घेतल्याविना आपल्या प्रवाहाच्या तटावर जे कोणतं दृश्य निर्माण होईल त्याचं प्रतिबिंब झेलत राहायचं. सरोवरात केवळ सूर्य-चंद्राचच प्रतिबिंब पडत नसतं. किनाऱ्यावरची घाणेरडी कुत्री- डुकरंसुद्धा तोंड घालून प्रतिबिंब पाडू शकतात. काळाला त्याची मुळीच पर्वा नसते.