ही लघु कादंबरी रुक्मिणीबाईंच्या परिवर्तनाची जीवनकहाणी तर आहेच, पण त्याहीपलीकडे ती खूप काही चित्रित करू पाहते. त्यांच्याभोवतीचा समाज, त्या समाजातील आर्थिक व सामाजिक स्थित्यंतरे आणि त्यांचा मानवी जीवनावर होणारा परिणाम या सार्यांचे चित्रण येथे मोठ्या गोळीबंदपणे प्रकट होते. भोवतीचा समाज माणसांना कसा आरपार बदलून टाकतो, याचे चित्रण वाचकांच्या मनात प्रश्न निर्माण करणारे तर आहेच,
पण अंतर्मुख करणारेही आहे. माणसांबरोबरच एका संपूर्ण गावाच्या परिवर्तनाचेही चित्रण येथे येते. मध्ययुगीन परंपरांची मखमली शाल अंगावर घेऊन वावरणारे गाव बदलायला लागते. पाहता पाहता ते एक औद्योगिक शहर म्हणून नावारूपाला येते. त्यातून तिथली सारीच मूल्ये बदलतात. पैसा हीच सर्वांत मोठी शक्ती होऊन जाते. आणि अध्यात्मनालाही बाजारू स्वरूप प्राप्त होऊन जाते. जागतिकीरणाच्या प्रभावात उभे राहणारे औद्योगिक जगत आतून कसे पोखरून निघालेले असू शकते, याचे अतिशय भयावह चित्रण वाचकांना जगाकडे पाहण्याची एक नवीच दृष्टी देते. मराठी औद्योगिक जगताचे अंतरंग प्रकट करणारे फारसे लिहिले गेले नाही. ही उणीव या लघु कादंबरीने समर्थपणे भरून काढली आहे, असे वाटते