दुबई ते मुंबई प्रवास करणारं एक विमान. विमानतळावरून ते हवेत झेपावताच काही प्रवासी निद्राधीन होतात. जागं झाल्यावर त्यांना कळतं की, त्या मूठभर प्रवाश्यांचा अपवाद वगळता पायलटसह इतर सर्व प्रवासी विमान हवेत असतानाच गायब झालेले आहेत. पायलट विना हवेत अधांतरी उडणारं एक विमान. विमानात, किंबहुना संपूर्ण विश्वातच फक्त आठ-दहा प्रवासी. त्या प्रवाश्यांनी काळाविरुध्द पुकारलेल्या एका विलक्षण लढ्याची ही विस्मयकथा. ज्यांच्या मनातील भय-विस्मयाचे आकर्षण अद्याप लोपलेले नाही, अशांना ही कादंबरी धक्का देऊन जाईल, हे नि:संशय.