आनंद यादव ह्यांच्या आत्मकथनात्मक लेखनाचा हा अंतिम मनोहरनयनमनोहर टप्पा `झोंबी`, `नांगरणी` आणि `घरभिंती` या आत्मचरित्राच्या तीन खंडांनंतरचा हा चौथा खंड काचवेल. नव्या घरातील सोप्याच्या भुईवर ग्रामीण भागात काचवेल काढण्याची लोकप्रथा आहे. काकणांच्या काचतुकड्यांनी ही वेल रेखली जाते. ही वेल वंशवेलीचंही प्रतीक असते. त्या घराची गृहिणी नकळत स्वतःला वंशवेल मानते. तिची मुलं ही त्या वेलीवरच्या कळ्या, फुलं असतात. जेवढी मुलं, तेवढे तागोरे ती काढते... आईची ही दैवी लोककला मी पहिल्यांदा बघत होतो. यथाकाळ माझी सगळी भावंडं त्या वेलीवर रांगली. मी सोप्यात बसून अभ्यास केला; त्या अभ्यासालाही काचवेलीचा कशिदा मिळाला. पंधरासोळा वर्षे ही वेल तिथं पायघडीसारखी पहुडली. तेव्हापासून मी साठ वर्षांच्या आयुष्यात खूप काचा तुकड्यातुकड्यांनी गोळा केल्या. मला आकर्षक वाटणारे रंगीत तुकडे जपून ठेवले. जागोजागी भेटलेल्या कसबी कासारांनी मला ते प्रेमाने देऊ केले. त्या तुकड्यांनीच माझ्या व्यक्तिमत्त्वाची वेल सिद्ध झाली. अंतिमत: ही काचवेल आणि तिची भूमी ही मराठी समाजाचं आणि संस्कृतीचं प्रतीकही आहे, असं जाणवलं. मी फक्त भारवाही.