मध्ययुगीन संतसाहित्य हा भारतीय संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. याचे केवळ साहित्यिक मूल्यच नव्हे तर सामाजिक आणि धार्मिक उपयुक्तताही महत्त्वाची आहे. मध्ययुगीन हिंदी संत काव्याचे प्रवर्तक महात्मा कबीर त्यांच्या अमृतमय वाणीमुळे ते आजही प्रख्यात आहेत. निरक्षर असूनही उच्च कोटीचे ज्ञान संपादन करून त्यांनी जनजागृती केली आणि आपल्या दिव्य वाणीने इतिहासात आपले नाव चिरस्थायी केले. धर्म-अधर्म, जन्म-मृत्यू, वैराग्य-प्रेम अशा विविध विषयांवरील त्यांच्या रचना सर्वश्रुत आहेत.कबीर साहित्यातील जीवनानुभव आणि भाषा यांमुळे ते आजही तितकेच प्रभावोत्पादक आणि प्रासंगिक आहे. त्यांची सहज सुंदर अभिव्यक्ती, प्रांजलता, ओजस्वी भाषा, प्रवाहमयी वाणी यामुळे ते वाचकांना मंत्रमुग्ध करतात. म्हणूनच त्यांचे काही 501 निवडक दोहे घेऊन भावार्थासहित वाचकांपुढे प्रस्तुत करण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे.ज्योतीने तेजाची आरती करावी किंवा पाण्याने सूर्याला अर्घ्य द्यावे, तसे या शब्दरूपी मौक्तिकहाराने त्या प्रतिभाशाली महान संताला विनम्र अभिवादन.कबीरांच्याच शब्दात शेवटी म्हणावेसे वाटते,जिन ढूँढा तिन पाइया, गहिरे पानी पैठ।मैं तो बौरी डूबन डरी, राही किनारे बैठ॥या ज्ञानसागराच्या किनाऱ्यावर आळसाने केवळ बसून न राहता जे मिळेल ते ग्रहण करण्याचा, जितके मोती मिळतील ते वेचण्याचा हा अल्पसा प्रयत्न!