अस्सल ललित गद्य भावकाव्यच असते. कुसुमावती देशपांडे यांचे ललित गद्य आठवते ना? त्यांच्या ललित गद्याला समीक्षेचे विदग्ध वजन आहे. कुसुमावतींनंतर तसे ललित गद्य मराठीत क्वचित लिहिले गेले. ते आता
‘जुने दिवे, नवे दिवे’मध्ये आविर्भूत झाले आहे. ‘‘कवीला कविता स्फुरावी तशी मला समीक्षा स्फुरते’’ असे दभि म्हणतात; हे ललित गद्यही तसेच आहे : कवितेसारखे, सर्जनशील समीक्षेसारखे; फरक इतकाच की हे लेखन कवितेहून मोकळे आणि समीक्षेहून सघन आहे; कुसुमावती, दुर्गा भागवत, नानासाहेब गोरे यांच्या वळणाने जाणारे! थोडे सारखे, थोडे वेगळे.