मराठीतील जुन्या नव्या कथाकारांच्या गर्दीत काही नावे आरंभापासूनच वेगळी उमटून पडली, त्यात प्रिया तेंडुलकर हे नाव येते. हा त्यांचा तिसरा कथा-संग्रह. 'ज्याचा त्याचा प्रश्न', 'जन्मलेल्या प्रत्येकाला' हे आधीचे. सहसा पांढरपेशा वाचकाला न भेटणारे अनुभव, त्यांची थेट व आरपार हाताळणी, कथेतील रौद्र नाटय हेरून ते साक्षात् समोर उभे करण्याचे सामर्थ्य आणि मानवी मनातला हळवा गुंता हळूवार हाताने सोडवून तो नेमका मांडण्याचे कौशल्य ही या कथांची वैशिष्टये. मात्र जीवनाकडे _ यात स्त्री-जीवन आले - पहाण्याची स्वत:ची एक स्वतंत्र दृष्टी हे या लेखनाचे मोठे वैशिष्टय म्हणावे लागेल. या कथांहून उजव्या कथा मराठीत भेटतील. या कथांहून डाव्या कथांचीही उणीव नाही. मात्र या कथांसारख्या कथा मराठीत फक्त प्रिया तेंडुलकर याच लिहू शकतात म्हणून या कथा-संग्रहाचे महत्त्व.