पैशामागे लागलेले आई-वडील मुलांपुढचे आदर्श नष्ट करतात. शरीर ही प्रदर्शनाची वस्तू समजून तिची किंमत वसूल करणा-या मुली मानसिक प्रदूषणाला कारणीभूत आहेत. उत्तान दृश्यं तरुण मनाला चाळवतात. आज सत्तेसाठी चालणारी साठमारी पाहिली की प्रश्न पडतो, नव्या पिढीपुढे आपण कोणती श्रद्धास्थानं ठेवणार आहोत? ज्यांचा सूर्य मावळला आहे तीच आज प्रकाशाचा शोध घेताहेत; स्वतःची दिवली घेऊन मार्ग काढताहेत. शिक्षा भोगत असणा-या कैद्यांकडून समाजाने अपेक्षा ठेवताना, शिक्षा भोगून तावूनसुलाखून निघालेले हे तरुणच मनातल्या श्रद्धांना झळ पोचू देत नाहीत. त्यांना चांगलं व्हायचंय. आपण आपला आश्वासक हात पुढे केला पाहिजे.