प्राचीन काळापासून स्त्रियांना समाजात दुय्यम स्थान दिलं गेलं. साहजिकच त्याचा महिलांना शिक्षणासाठी मिळणाऱ्या संधी, पर्यायाने कामासाठी होणारी निवड यांवरही प्रतिकूल परिणाम होत आला आहे. हा संघर्षाचा कालखंड फार खडतर होता हे वेगळं सांगायला नको.मात्र संघर्षाचं हे वलय भेदून आपल्या जिद्द, चिकाटी आणि लखलखत्या कर्तृत्वानं अशा प्रतिकूल परिस्थितीवर काही महिला शास्त्रज्ञांनी खंबीरपणे मात केली आणि मानवी विकासाला नवी दिशा दिली. वैज्ञानिक मनोवृत्तीचा प्रसार व्हावा आणि आजचे विद्यार्थी तसेच भविष्यातील शास्त्रज्ञांना या पुस्तकात समाविष्ट महिला शास्त्रज्ञांच्या दृढ इच्छाशक्ती आणि परिश्रमांतून प्रेरणा मिळावी, या विश्वासावरच हे पुस्तक वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणाऱ्या प्रत्येक भारतीयाला समर्पित केले आहे. आर्थिक अथवा इतर अडचणीदेखील महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या महिलांच्या यशात अडथळा आणू शकत नाहीत. सर्व महिला शास्त्रज्ञांचे संकलन करणे निश्चितच कठीण कार्य आहे. तरीही विज्ञान क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या महिला शास्त्रज्ञांचा प्रेरणादायी परिचय या पुस्तकात देण्यात आलेला आहे. विज्ञानाच्या विविध क्षेत्रांत आपल्या कर्तबगारीचे झेंडे रोवणाऱ्या जगप्रसिद्ध महिला शास्त्रज्ञांचे हे वेधक चरित्र.