ह्या कथासंग्रहात विविध थाटाघाटाच्या एकूण एकोणीस कथांचा समावेश केलेला आहे. सर्वसामान्य माणसांच्याच त्या कथा आहेत. अवतीभवतीच्या वातावरणातून, साध्या साध्या घटनांतून घेतलेली कथाबीजं फुलवताना लेखिकेने जशी अलंकृत
भाषा टाळली आहे, तशीच चर्चात्मक वर्णनंही टाळली आहेत. त्यामुळेच ह्या सर्व कथांमध्ये पूर्वनियोजित घडवणुकीपेक्षा अनुभूतिनिष्ठ अभिव्यक्ती अधिक दिसते.
कल्पनेच्या भरारीपेक्षा संवेदनशील मनाने उत्कटपणे टिपलेले अनुभव तरल स्मृतीतून व्यक्त होताना दिसतात. लेखनातील उत्स्फूर्ततेमुळे सर्व कथांमधून एक प्रत्ययकारी अनुभव मिळत राहतो.
ह्या संग्रहाचा मानबिंदू ठरावा असे कथा चतुष्ट्य लक्षात राहते ते - कथा विषयातील वेगळेपणामुळेच. या कथांमध्ये लेखिकेने व्यसनाधीन व्यक्तीचे भावविश्व, व्यसनमुक्ती केंद्रातील दाहक वास्तव अगदी सरळ साध्या भाषेत, कुठल्याही प्रकारच्या कृत्रिम नाट्यमयतेच्या आहारी न जाता, नैराश्यवादाचा
पुरस्कार न करता वाचकांसमोर ठेवले आहे. ह्या चारही कथा निव्वळ वाचनीयच नाहीत तर वाचकाला अंतर्मुख करणार्या आहेत.