पं. नेहरूंच्या निधनानंतर लालबहादूर शास्त्री यांची दीड वर्षांची कारकीर्द सोडली तर देशाची राज्यसूत्रे या निवडणुकीपर्यंत इंदिरा गांधी यांच्या हातात होती. आपण आपल्या वडिलांचा वारसा चालविणार आहोत, असे सत्ताग्रहण करताना इंदिरा गांधी यांनी अभिवचन दिले होते; आणि निवडणुकीतील शेवटच्या भाषणापर्यंत त्या या अभिवचनाचा पुनरूच्चर करीत होत्या. लोकशाही, समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता ही आपल्या राजकीय तत्त्वज्ञानाची त्रिसूत्री आहे अशी पं. नेहरूंची धारणा होती आणि पित्याचा राजकीय वारसा आपल्याकडे आल्यानंतर इंदिरा गांधी यांनी याच त्रिसूत्रीचा पुरस्कार केला. तरीही या त्रिसूत्रीच्या कार्यवाहीमधील दोघांचा प्रवास वेगळ्या दिशेने झालेला आढळून येतो. आपले वडील आणि आपण यांतील फरक खुद्द इंदिरा गांधी यांनीच विशद केला होता. ‘ माझे वडील संत होते तर मी राजकारणी आहे.’ असे त्यांनी म्हटले आहे.