दुसर्या महायुद्धात ज्यांनी असामान्य साहसं केली अशा काही गुप्तहेरांच्या चित्तथरारक कहाण्या हा या कथासंग्रहाचा प्रमुख विषय आहे.आतापर्यंत तुम्ही पुष्कळ हेरकथा वाचल्या असतील; परंतु गुप्तहेर कसा तयार केला जातो याबद्दलची माहिती तुम्ही क्वचितच कुठे वाचली असेल. या पुस्तकात हेरशाळांमध्ये गुप्तहेर कसे तयार केले जातात, याबद्दलची माहिती दिलेली आहे. त्यावरून गुप्तहेर बनणार्या व्यक्तीस किती कठीण अभ्यासक्रमास तोंड द्यावं लागतं याचा तुम्हाला अंदाज येईल.गुप्तहेरांचं जग हे मोठं विलक्षण असतं. गुप्तहेराचं जीवन वरवर इतकं आकर्षक वाटत असलं तरी प्रत्यक्षात ते कल्पनादेखील करता येणार नाही इतक्या भयंकर धोक्यांनी भरलेलं असतं. पावलापावलावर मृत्यू उभा असतो. हेरगिरीच्या जगातील अशा विलक्षण नाट्यपूर्ण हकिगती या पुस्तकात सांगितलेल्या आहेत. त्याचबरोबर विविध देशांमधल्या शूर नि धाडसी गुप्तहेरांच्या काही चित्तवेधक कथांचा अंतर्भावही प्रस्तुत पुस्तकात केला आहे. राष्ट्राच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं सक्षम हेरसंघटना असणं किती आवश्यक आहे, याचा प्रत्यय हे पुस्तक वाचल्यानंतर वाचकांना येईल.