सार्वजनिकतेची शोकांतिका या जटिल समस्येवर उपाय शोधणार्यांना २००९ साली नोबेल पुरस्कार मिळाला.
या अमूल्य तत्त्वज्ञानाचा वापर करून भारतातील वनांच्या वेदनांवर उपाय शोधण्याचा प्रयत्न किशोर रिठे या वनवेड्या लेखकाने या पुस्तकात केला आहे. महाराष्ट्रात गेल्या दशकभर सुरू असलेल्या वनसंवर्धनाच्या प्रयत्नांचा आढावा घेऊन वनसंरक्षणाचे अंतिम ध्येय कसे साध्य होऊ शकेल, हे सांगणारा मार्ग वाचकांना व निसर्गप्रेमींना पथदर्शी ठरणारा आहे.
महाराष्ट्रातील वनांनी वेढलेल्या गावांचे प्रश्न सोडविण्याची गुरुकिल्ली म्हणा, की राज्यातील वनांना सांभाळणार्या सुनियोजित प्रयत्नांचा आढावा म्हणा, यातील प्रत्येक लेख वाचकाला वनांच्या रक्षणासाठी हिरवा संघर्ष करण्यासाठी तयार करणारा आहे. ‘पर्यावरण’ आणि ‘वाद’ याच्या पलीकडे जाऊन साकारलेल्या ‘यशोगाथा’ प्रेरणादायी आहेत.
जंगल, पाणी, कोळसा व शेतजमिनी धडाधड संपवून चक्क ‘भारतमातेलाच’ विकायला उभी झालेली भ्रष्ट राजकीय-प्रशासकीय यंत्रणा कशी बदलणार, हे मात्र अनुत्तरीतच आहे.
महाराष्ट्राच्या वनाच्छादित प्रदेशांमधील हिरवा संघर्ष या पुस्तकात मांडला आहे. ङ्गक्त प्रश्न मांडून दु:ख वाटण्यापेक्षा, येथे उत्तरेही शोधण्याचा प्रयत्न केला आहे. भविष्यातील या पर्वताएवढ्या हिरव्या संघर्षासाठी तयार राहण्याची प्रेरणाही आपणा सर्वांनाच या पुस्तकातून मिळू शकेल.